कुडण गावात बिबट्याचा लहान मुलावर हल्ला : परिसरात भितीचे वातावरण
कुडण गावात बिबट्याचा लहान मुलावर जीवघेणा हल्ला : परिसरात भितीचे वातावरण पालघर : पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे प्रेम जितेंद्र पाटील वर्ष सात या शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार काल घडलेला असून बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कुडण दस्तुरीपाडा येथे प्रेम जितेंद्र पाटील हा लहान मुलगा घरा बाहेर एकटाच खेळत असताना बिबट्याने हा हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले जाते. या बिबट्याचा हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व चेहर्याला चावा घेण्याने आणि ओरबडल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. या बिबट्याचा वनविभागाचे कर्मचारी या भागात शोध घेत असून, हल्ल्यात जखमी प्रेमला सिलवासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत भितीचे वातावरण पसरलेले असून गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याचे नागरिकांकडून बोललं जातं असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला त्वरित पकडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.