शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्समध्ये सर्पदंशाने महिला कामगाराचा मृत्यू
शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्समध्ये सर्पदंशाने महिला कामगाराचा मृत्यू
बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीतील शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्स लिमिटेड (प्लॉट क्र. D-1) येथे काम करत असताना अभिलाषा दीपक आचार्य (वय 28, रा. साईलोक नगर, गणेश नगर, बोईसर) या महिला कामगाराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
गेल्या दहा महिन्यांपासून पॅकिंग विभागात कार्यरत असलेल्या अभिलाषा या काम करत असताना घोणस (रसेल वायपर) या विषारी सापाच्या पिल्लाने डाव्या पायाला दंश केला. प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम टिमा हॉस्पिटल व नंतर वरद हॉस्पिटल येथे हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सर्पमित्र राजू निकम (पास्थळ) यांनी साप जिवंत पकडला. तपासात तो घोणस प्रजातीचा अत्यंत विषारी साप असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलम संखे यांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर टीका करत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, मुलांचे मोफत शिक्षण व इतर सुविधा देण्याची मागणी केली होती. अखेरीस चर्चेनंतर कंपनीने १२ लाख रुपयांचा मोबदला देण्यास लेखी मान्यता दिली असून, सोमवारी धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी पतीस २५ हजार रुपये रोख देण्यात आले.
कंपनीतील महिला कामगार आरती झा यांनी सांगितले की, “आम्ही दहा तास ड्युटी करतो, पण दिवसाला फक्त ४०० रुपये वेतन मिळते. पगार महिनाअखेरीस रोख स्वरूपात दिला जातो आणि सुरक्षेची साधने अत्यंत अपुरी आहेत.”
या घटनेने औद्योगिक वसाहतीतील कामगार सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा रंगली आहे.
Comments
Post a Comment