आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक
आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक
बोईसर : तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर १५ मेच्या रात्रीपासून १६ मेच्या सकाळीपर्यंतच्या दरम्यान एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. अवघ्या पाच दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने सात आरोपींना अटक करून तपासात मोठे यश मिळवले आहे. या आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे.
अभिषेक राम सिंग (वय ३६, रा. पास्थळ, पालघर, मूळगाव कोतवालपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून तारापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६/२०२५ नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध तपास पथकांनी तत्काळ काम सुरू केले. तपासादरम्यान घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांची चौकशी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण तसेच तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे वसई-विरार, सुरत (गुजरात) व बिहार राज्यातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली.
या तपासातून खालील सात जणांना ताब्यात घेण्यात आले: १. भूषण सुरेश धोडी (१९) २. केतन रमेश शिणवार (२०) ३. रोहित संजय कवळे (१९) ४. दिवेश संतोष सुतार (१८ वर्षे ६ महिने) ५. विशाल नंदू सोमण (२३) ६. साहिल राजेंद्र पवार (१८) ७. एक विधी संघर्षीत बालक (१६)
पोलीस तपासात आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, दि. १५ मे रोजी रात्री पार्टीनंतर हे सर्वजण फिरण्यासाठी बाहेर पडले होते. आंबटगोड मैदानात झोपलेल्या अभिषेक यांना त्यांनी उठवून शिवीगाळ केली व मारहाण केली. अभिषेक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पाठलाग करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. हत्या पूर्वद्वेषातून झाली की अन्य कोणते कारण होते, याचा तपास सुरु आहे.
दि. २० मे रोजी आरोपी क्रमांक १ ते ६ यांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीवर किशोर न्याय कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील (गुन्हे शाखा), सपोनि निवास कणसे (तारापूर पोलीस ठाणे), सपोनि अनिल व्हटकर, पोउनि स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि रोहित खोत, पोउनि गोरखनाथ राठोड , पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/कपिल नेमाडे, पोहवा/भगवान आव्हाड, पोना/कल्याण केंगार, पोअमं/प्रशांत निकम, पोअमं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment