तारापूर प्रदूषणावर मनसे आक्रमक ; टिमा आणि टीईपीएस बरखास्तीची मागणी

तारापूर प्रदूषणावर मनसे आक्रमक ; टिमा आणि टीईपीएस बरखास्तीची मागणी

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर उपाययोजना ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बैठक उधळण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला. टीईपीएस व टिमा यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करत "टीईपीएस बरखास्त करा" अशी ठाम मागणी मनसेने केली आहे.

बुधवारी टिमा सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व टिमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते अचानक सभागृहात घुसले. प्रदूषणग्रस्त गावांतील सरपंच व नागरिकांना न बोलावल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कागदपत्रे फेकून निषेध केला. मनसेचे भावेश चूरी, धीरज गावड, सिद्धेश महाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बैठकीत गोंधळ घातला.


औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, टिमा व टीईपीएस या संस्थांनी प्रदूषण रोखण्यास पूर्ण अपयश आल्याचा आरोप मनसेने यावेळी केला. मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे म्हणाले, "टीईपीएस ही संस्था केवळ कागदोपत्री कामे दाखवून जनतेची फसवणूक करत आहे. ती त्वरित बरखास्त करावी ही आमची ठाम मागणी आहे."


घटनेनंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बैठकीनंतर एमपीसीबीचे सहसंचालक जगन्नाथ साळुंखे यांनी, "मनसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल व तक्रारींचे निराकरण केले जाईल," असे आश्वासन दिले.


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या विषयावर मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक