पालघरमध्ये आंदोलक कामगारांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न
पालघरमध्ये आंदोलक कामगारांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न
पालघर – वेवूर येथील मस्तान टॅंक इंटरप्राईजेस कंपनीसमोर आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांवर कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीने थेट गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालकीणीनं चालकाला कारमधून उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या अंगावर गाडी नेली. या घटनेत तीन ते चार महिला कामगार जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कंपनीतील किमान वेतन न मिळणे, अतिरिक्त कामाचे तास, तसेच असुरक्षित कामाच्या अटी याविरोधात महिला कामगारांनी शांततेत आंदोलन सुरू केले होते. मात्र, कंपनीच्या मालकीणीने माजुर्डेपणा दाखवत थेट आंदोलकांच्या दिशेने गाडी चालवत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अचानक गाडी अंगावर आल्यामुळे अनेक महिला खाली पडल्या व जखमी झाल्या.
घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून कामगार संघटनांनी व स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित मालकीणीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “हा प्रकार कामगारांच्या हक्कांना चिरडण्याचा आहे आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मालकीणीवर कठोर कारवाई करावी,” अशी प्रतिक्रिया कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments
Post a Comment