मेडली फार्मास्युटिकल्स व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
मेडली फार्मास्युटिकल्स व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीत झालेल्या वायुगळतीच्या भीषण दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून औद्योगिक व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.
गुरुवारी (२१ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेदरम्यान रिऍक्टरमधून अचानक विषारी वायू गळती झाली. यात सहा कामगार बाधित झाले. त्यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश राऊत (३८), बंगाली ठाकूर (३८), धनंजय प्रजापती (३०) आणि कमलेश यादव (३०) यांचा मृत्यू झाला. तर उत्पादन व्यवस्थापक रोहन शिंदे (३५) आणि निलेश हाडळ (३२) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून कारखाना व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला. मृत कामगार कमलेश यादव याच्या भावाने, सुरक्षाविषयक साधनांचा अभाव आणि रुग्णालयात दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे अपघात गंभीर ठरल्याचा आरोप केला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राजेंद्र गावित, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक तसेच पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट दिली. शुक्रवारी सकाळी मृत कामगारांचे शवविच्छेदन तारापुर ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
या दुर्घटनेप्रकरणी संचालक सोहेल खातीब, मुख्य आर्थिक अधिकारी देवेंद्र भगत, प्रकल्प प्रमुख धर्मश पटेल व देखभाल अभियंता शुभम ठाकूर यांच्याविरोधात बोईसर पोलिसांत गुन्हा क्रमांक 364/2025 नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 304(2), 337, 338, 284, 287 तसेच औद्योगिक सुरक्षा नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक माधव तोटेवाड यांनी सांगितले की, “२१ ऑगस्ट रोजी घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. सविस्तर तपासानंतर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.”
या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे उद्योग व्यवस्थापनाने केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment