सायबर फसवणुकीतील २१.३० लाख रुपये बोईसर पोलिसांनी वाचवले
सायबर फसवणुकीतील २१.३० लाख रुपये बोईसर पोलिसांनी वाचवले
बोईसर – हायहोल्ट इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, एमआयडीसी बोईसर या कंपनीच्या बँक खात्यातून सायबर फसवणुकीत तब्बल २१ लाख ३० हजार ५०० रुपये काढण्यात आले होते. मात्र, बोईसर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे, पालघर यांच्या संयुक्त व तत्पर कारवाईमुळे ही संपूर्ण रक्कम गोठवून कंपनीच्या खात्यात परत मिळवण्यात यश आले.
३१ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.५६ वाजता कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद ठक्या घरत यांना आरोपी राहुल सिंग या इसमाचा मोबाईलवरून NOTICE OF DISCONNECTION या शीर्षकाखाली वॉट्सअॅप संदेश आला. “आज रात्री ९.३० वाजता कंपनीचे वॉटर कनेक्शन डिसकनेक्ट केले जाईल” असा मजकूर देत तो MIDC कार्यालयातून बोलत असल्याचा भास आरोपीने निर्माण केला. नवीन ग्राहक क्रमांक अपडेट करण्याच्या बहाण्याने Water Bill Update-1.apk ही फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. त्या फाईलमध्ये बँक खात्याची माहिती भरताच कंपनीच्या खात्यातून २१.३० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी फिर्यादीकडून आवश्यक माहिती मिळवून आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधला आणि व्यवहार तात्काळ थांबवले. तसेच सायबर पोलीस ठाण्याला माहिती देऊन तातडीची कारवाई सुरू करण्यात आली. फिर्यादींना १९३० या हेल्पलाईनवर कॉल करण्याचा सल्ला देण्यात आला. कंपनीचे संचालक प्रफुल्ल शहा यांनी National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर तक्रार नोंदवली.
सायबर सेलने तातडीने ट्रान्झॅक्शन होल्ड करून संपूर्ण रक्कम कंपनीच्या खात्यात परत आणली. फसवणुकीनंतरच्या गोंधळात पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे १०० टक्के रक्कम वाचवण्यात आली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार (बोईसर पोलीस ठाणे) तसेच पोउपनि. रूपाली गुंड, पोउपनि. भोसले, पोअं. रूपेश पाटील, पोअं. जिग्नेश तांबेकर (सायबर पोलीस ठाणे, पालघर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment