चिंचणी एम.के. कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
चिंचणी एम.के. कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
बोईसर – एम.के. ज्युनियर कॉलेज, चिंचणी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागप्रमुख प्रा. हरीश वळवी होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा. वळवी यांनी तरुणांनी टिळकांसारखा आचार, विचार आणि शरीराने सक्षम असा आदर्श घ्यावा, असे सांगितले. त्यांनी टिळकांच्या खंबीर नेतृत्वाचे महत्त्व सांगत अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून कामगार व शोषितांचे दुःख समजून घ्यावे, असे मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्त्या प्रा. प्रीती राऊत यांनी विद्यार्थ्यांनी टिळकांचे राजकीय कार्य आणि विचारांची व्याप्ती समजून घेतली पाहिजे, असे सांगितले. त्यांनी टिळकांनी सुरू केलेले उत्सव समाजभान वाढवणारे असल्याचे सांगत, समाजमाध्यमांच्या गर्दीत हे मूल्य जपण्याची गरज असल्याचे मत मांडले.
प्रा. मेघा पाटील यांनी “लोकमान्य” व “लोकशाहीर” या शब्दांतून टिळक व अण्णा भाऊ यांचे कार्य प्रभावीपणे उलगडले. कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ पाटील यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या टिळकांच्या विचाराची आठवण करून देत, जात-धर्म-पंथ-पक्ष या चौकटीपलीकडे जाऊन नवभारत घडविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कुमारी कस्तुरी मोदले हिने लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वज्वल राऊत यांनी तर प्रास्ताविक प्रा. संजय बहारे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी मोरे यांनी केले. फलकलेखनाची जबाबदारी प्रा. लहू महाजन यांनी पार पाडली.
कार्यक्रमाला प्रा. दिनकर टेकनर, प्रा. मंगेश ठेपणे, प्रा. चारुशीला बहारे, प्रा. सुलोचना पाडवी यांच्यासह एन.एस.एस. व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment