नालासोपाऱ्यात बनावट मार्कशीट रॅकेट उघड; 65 हजारांत पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नालासोपाऱ्यात बनावट मार्कशीट रॅकेट उघड; 65 हजारांत पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नालासोपारा – नालासोपारा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या 65 हजार रुपयांत डिग्री मिळवून देणाऱ्या बनावट मार्कशीट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईस तब्बल नऊ महिने लागल्यानंतरही रॅकेटचा मुख्य सूत्रधार मोकाट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. 18 जुलै रोजी आरोपी एजंट अनुपमा नयन मंडल, संगीता सुनील जैन आणि कर्मचारी श्रद्धा आरेकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या रॅकेटचे मुख्य आरोपी दीप भल्ला आणि रवी भल्ला यांना कारवाईदरम्यान उपस्थित असूनही अटक न झाल्याचा गंभीर आरोप रावल यांनी केला आहे.


या रॅकेटमध्ये फक्त 65,000 रुपयांमध्ये मागील तारखेचे (बॅकडेटेड) B.Com, LLB, BA, BBA शाखांचे निकाल, मार्कशीट उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या कारवाईत प्रिंटर, स्टॅम्प्स, बनावट कागदपत्रे तसेच विविध शाखांचे मार्कशीट आणि रिझल्ट अशा महत्त्वाच्या पुराव्यांसह काही विद्यापीठांवरील कागदपत्रे जप्त केली आहेत.


या प्रकरणी ISBN University (छत्तीसगड), मॅथ्स युनिव्हर्सिटी (रायपूर, छत्तीसगड), नीलम युनिव्हर्सिटी (कैथल, हरियाणा), मोनार्ड युनिव्हर्सिटी (हापुर, उत्तर प्रदेश), कॅलोक्स युनिव्हर्सिटी, टीचर्स युनिव्हर्सिटी (अहमदाबाद, गुजरात), कलिंगा युनिव्हर्सिटी (रायपूर, छत्तीसगड), अरनी युनिव्हर्सिटी (कांगरा, हिमाचल प्रदेश), सनराईज युनिव्हर्सिटी (अलवर, राजस्थान) या विद्यापीठांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.


सन्नी रावल यांनी या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, विद्यापीठे व काही शिक्षण संस्था गुंतल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच वालीव पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी संदेश राणे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ही कारवाई केवळ हिमनगाच्या टोकाप्रमाणे असून, या रॅकेटच्या सखोल तपासाची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी सध्या होत आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक