बदली आदेश असूनही अधिकारी पालघरमध्येच; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

बदली आदेश असूनही अधिकारी पालघरमध्येच; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पालघर : राज्यभरात झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांमध्ये पालघर जिल्ह्यातील अभियंता सचिन गायकवाड यांची बदली डहाणू उपविभागात झाली असूनही, ते अद्याप पालघर उपविभागात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या ३० मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, आदेश लागू होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले तरीही गायकवाड यांची बदली अद्याप प्रत्यक्षात आली नसल्याने प्रशासकीय अपारदर्शकतेवर बोट ठेवले जात आहे.


दरम्यान, बोईसर विभागातील सुतारपाडा येथील समाज मंदिराच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात वारंवार तक्रारी असूनही, संबंधित ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याने अभियंता गायकवाड यांच्यावर ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


याचबरोबर, बोईसर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीर बांधकामे आणि धोकादायक फलकांवर विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक प्रशासनावरही नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे.


"बदलीचे आदेश असतानाही गायकवाड यांची जागा न बदलणे, हे कोणाच्या दबावामुळे?" अशी चर्चा नागरिकांत रंगत असून, यामागे राजकीय अथवा विभागीय वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून गायकवाड यांची तातडीने बदली अमलात आणण्याची व बोईसरमधील सार्वजनिक कामांवर चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उपविभागीय अधिकारी अभय जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळल्यामुळे प्रशासनाची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक