गुरुपौर्णिमेला आई-वडिलांचे पूजन : प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम
गुरुपौर्णिमेला आई-वडिलांचे पूजन : प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम
बोईसर – स्वामी विवेकानंद एज्युकेशन ट्रस्टच्या प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, बोईसर येथे गुरुपौर्णिमा यंदा आगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरी करण्यात आली. "आई-वडील हेच खरे गुरु" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली.
गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या या विद्यालयात सध्या ८०० ते ८५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्कारांची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये कुटुंबमूल्ये आणि आदरभावना वाढावी, यासाठी शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना फुले अर्पण केली, कुंकू लावले, आरती ओवाळली, पाय धुतले आणि नमस्कार करून पूजन केले. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण शाळेत भक्तिमय आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सूर्या एक्सप्रेसचे संपादक विजय बोपर्डीकर, पंचतत्त्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ आणि नवा हालचे संपादक जगदीश करोतिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार सुशांत संखे व पत्रकार स्वप्निल पिंपळे यांचीही उपस्थिती होती.
या वेळी विद्यार्थ्यांनी ‘गुरु-शिष्य परंपरा’ या विषयावर नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे पालक, शिक्षक व पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पार पडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचा आदर व संस्कारांची बीजं पेरणारा ठरला.
शाळेचा उद्देश केवळ पुस्तकी शिक्षण न देता, जीवनमूल्ये आणि संस्कार देण्याचा असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.
Comments
Post a Comment