बोईसरमध्ये रहिवासी संकुलांतील व्यावसायिक अतिक्रमण वाढले; सुरक्षा आणि वाहतुकीस मोठा धोका
बोईसरमध्ये रहिवासी संकुलांतील व्यावसायिक अतिक्रमण वाढले; सुरक्षा आणि वाहतुकीस मोठा धोका
बोईसर : बोईसर शहरातील अनेक रहिवासी संकुलांमध्ये तळमजल्यावरील फ्लॅट्सचे अनधिकृतपणे व्यावसायिक गाळ्यांमध्ये रूपांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काही ठिकाणी फ्लॅटच्या भिंती पाडून रस्त्याकडे दरवाजे व शटर बसवले जात असून, त्या ठिकाणी दुकाने, क्लिनिक्स आणि कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
या प्रकारामुळे संकुलातील सामूहिक सुरक्षा व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षारक्षकांची व्यवस्था मुख्य प्रवेशद्वारापुरती मर्यादित राहिल्याने, बाजूच्या शटरमधून कोणताही व्यक्ती संकुलात नोंद न करता प्रवेश करू शकतो. त्यामुळे चोरी, अनधिकृत व्यक्तींचा वावर आणि संभाव्य गुन्ह्यांचा धोका वाढला आहे, अशी चिंता रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
◾वाहतूक कोंडीही वाढतेय
या दुकाने व कार्यालयांमध्ये येणाऱ्या लोकांची वाहने थेट संकुलाबाहेरील रस्त्यावर लावली जात असल्याने, परिसरात वाहतूक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
"सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून ती व्यक्तीगत फायद्यासाठी धोक्यात घालणं अयोग्य आहे," असे मत काही रहिवाशांनी व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही बिल्डर, दलाल आणि फ्लॅटमालक नियमबाह्य पद्धतीने संकुलांमध्ये व्यावसायिक वापर करून सामूहिक सुरक्षेचा बळी देत आहेत.
◾कायदे असूनही अंमलबजावणी नाही
नियमांनुसार, केवळ रहिवासी वापरासाठी मंजूर असलेल्या संकुलांमध्ये व्यावसायिक वापर करता येत नाही. मात्र प्रत्यक्षात नियम झुगारले जात असून, शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष ठळकपणे जाणवते.
◾रहिवाशांची मागणी
या वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित शासकीय विभागांनी तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता रहिवाशांकडून होत आहे.
Comments
Post a Comment