तारापूरमधील मे मॅक्स हील कंपनीत कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; औद्योगिक सुरक्षा नियमांचा भंग
तारापूरमधील मे मॅक्स हील कंपनीत कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; औद्योगिक सुरक्षा नियमांचा भंग
बोईसर– पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून सतत वादळी वाऱ्यांचे आणि अतिवृष्टीचे इशारे दिले जात असतानाही तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे मॅक्स हील (प्लॉट क्र. जे-०७) या कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर कारखान्यात छतावर वजनी पत्रे चढवण्याचे काम सुरू असून, कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांशिवाय उंचावर चढवले जात आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी वारा आणि पावसाचा जोर लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
विशेष म्हणजे, कामगारांनी सुरक्षा पट्ट्याबाबत विचारणा केली असता, कंपनी प्रशासनातील सावंत नावाच्या अधिकाऱ्याने "सुरक्षा पट्टा लावल्यास काम करताना अडचण होते" असे बेजबाबदार वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे औद्योगिक सुरक्षा विषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले असून, कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित घटनेबाबत औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक हिम्मतराव शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी "घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल" असे स्पष्ट केले.
त्यामुळे संबंधित कंपनीवर तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment