मनोरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांचा धडाकेबाज सापळा, सात दरोडेखोर थेट कोठडीत
मनोरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांचा धडाकेबाज सापळा, सात दरोडेखोर थेट कोठडीत
पालघर– मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नानीवली गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल सात आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली असून, आरोपींनी याआधीही गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
दि. १३ जुलै २०२५ रोजी रात्री २.४० वाजता प्रसाद विजय पाटील (वय २८, रा. नानीवली, ता. पालघर) यांच्या घरी काही अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तोंडाला रूमाल बांधले होते, तसेच त्यांच्या हातात लोखंडी रॉड, चिकटपट्टी सेल आणि अग्निशस्त्र होते. मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असताना घरमालकाला जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपी घाबरून पळून गेले. या घटनेनंतर पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.नं. २११/२०२५ कलम भादंवि ३३१(४), ६२, ३१०(४)(५), ३१२ सह हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पथकाने सात आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
१)संदीप अशोक वळवी (३६), रा. वळवीपाडा, कासा, ता. डहाणू
२)तुषार गणेश रटाटे (१९), रा. वळवीपाडा, कासा, ता. डहाणू
३)ऋषिकेश भगवान गुरव (२४), रा. कुंज, पो. कासा बुद्रुक, ता. विक्रमगड
४)रामदास रमेश सालकर (२५), रा. देहजे, ता. विक्रमगड
५)प्रणय गंगाराम गावित (१९), रा. धामणी, पो. कासा बुद्रुक, ता. विक्रमगड
६)अमोल अशोक चांगड (२०), रा. वाघाडी, वांगडपाडा, ता. डहाणू
७)भरत जयवंत मेढा (३८), रा. घाणेघर, पो. भोपोली, ता. विक्रमगड
या आरोपींकडून MH48-BH-2820 क्रमांकाची मारुती इको कंपनीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या गाडीची अंदाजे किंमत पाच लाख रुपये इतकी आहे. तसेच, अटक आरोपींनी डहाणू पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल गु.र.नं. १०१/२०२५ या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सातही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इतर साधने – अग्निशस्त्र, लोखंडी रॉड – जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, किंवा या टोळीने अन्य गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (पालघर विभाग) अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक रणवीर बयेस (मनोर पोलीस ठाणे) यांनी केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मनोर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील (मनोर पोलीस ठाणे) हे करीत आहेत.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment