वाढवणमध्ये बनावट कागदपत्रांनी जमीन हडपली; पाच जणांवर गुन्हा दाखल
वाढवणमध्ये बनावट कागदपत्रांनी जमीन हडपली; पाच जणांवर गुन्हा दाखल
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील जमिनींचे भाव वाढले असून जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाढवणजवळील आंबिष्टेवाडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबिष्टेवाडी येथील बारकू महाद्या भंडारी यांच्या नावावर गट क्रमांक ८०/५ मधील १.०१.०० हेक्टर जमीन होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुली वेणूबाई बाबुराव पाटील आणि कुटुंबीय या जमिनीचा ताबा घेऊन गेल्या ४० वर्षांपासून शेती करत आहेत. मात्र राजेंद्र दशरथ राऊत आणि रोहित दत्तात्रय राऊत यांनी त्याच नावाच्या इतर व्यक्तीच्या माहितीचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे महसूल विभागाच्या नोंदीमध्ये बदल करून जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी हर्षद बाबुराव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोईसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सखोल चौकशी करून राजेंद्र दशरथ राऊत, रोहित दत्तात्रय राऊत, मंगळा बारक्या राऊत, गणेश बारकू राऊत आणि वत्सला दत्तात्रय राऊत या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Post a Comment