भाताच्या तुसात लपवून गुटख्याची तस्करी ; १.७८ कोटींचा साठा जप्त
भाताच्या तुसात लपवून गुटख्याची तस्करी ; १.७८ कोटींचा साठा जप्त
पालघर– महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून पालघर पोलिसांनी सुमारे १.७८ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई तलासरी पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली असून, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विकासपाडा येथे दोन ट्रक थांबवून तपासणीदरम्यान ही तस्करी उघडकीस आली.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून दोन कंटेनर ट्रकमधून महाराष्ट्रात गुटख्याचा मोठा साठा आणला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलिस ठाणे) आणि प्रदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांना दिले.
संशयास्पद ट्रक क्रमांक KA-56-9490 आणि KA-39-A-3012 हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात असताना थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. ट्रक चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांमध्ये तपास केला असता, भाताच्या तुसात लपवलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १,७८,६५,२४८/- रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इफ्तेकार हबीब शेख (वय ४२, रा. कुर्ला, मुंबई) आणि अक्षय नंदकुमार सातपुते (वय २९, रा. सांगली) अशी असून, त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ आणि नियम २०११ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डहाणू विभाग) श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दरगुडे, श्रे. पोउपनि. एन. के. पाटील, सफौ. हिरामण खोटरे, पोहवा. ०६ धोडी, पी. पाटील, संदीप नांगरे, पी. के. चौरे, पोना. सचिन आव्हाड, पोअं. वरखंडे, पोअं. घाटाळ, के. एन. राबड, एन. जी. गांगोडा, के. डी. गांगोडा (सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे) तसेच पोअं. नरेश घाटाळ आणि बजरंग अमनवाड (नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांनी संयुक्तरित्या केली. त्यांच्या तडफदार आणि समन्वयात्मक कार्यवाहीमुळे ही मोठी तस्करी उघडकीस आली.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरगुडे करत असून, या तस्करीच्या साखळीदृष्ट्या तपास करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही कारवाई जिल्ह्यातील गुटखा माफियांवर मोठा धक्का मानली जात आहे.
Comments
Post a Comment