ड्रोन सर्वे प्रकरणी डहाणू येथे महत्वपूर्ण बैठक; नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन
ड्रोन सर्वे प्रकरणी डहाणू येथे महत्वपूर्ण बैठक; नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन
डहाणू : डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी बंदर प्रकल्पासाठी ITD कंपनीमार्फत सुरू असलेल्या ड्रोन सर्वेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलन केल्यानंतर, संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू येथे बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी महेश सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व श्रीमती कणसे, सहायक पोलीस निरीक्षक पाचपूते, तसेच बिल्डिंग इन्व्हिरॉन्मेंट कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी उपस्थित होते. याशिवाय वरोर, धाकटी डहाणू, चिंचणी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक मच्छीमार बांधव देखील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नागरिकांनी वाढवण ग्रिनफील्ड महामार्गासाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीचा मोबदला अधिक मिळावा, बंदर प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा, तसेच मच्छीमार बांधवांना संभाव्य नुकसानीची भरपाई मिळावी अशा विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर प्रतिसाद देताना उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याबाबत JNPT ने मान्यता दिल्याचे सांगितले आणि इतर मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.
प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बिल्डिंग इन्व्हिरॉन्मेंट कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सर्वे केला जात असून, या संदर्भात विवेक कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली.
विशेष म्हणजे, ही बैठक आंदोलनकर्त्यांच्या मागणीवरूनच आयोजित करण्यात आली असली तरी, ते स्वतःच या बैठकीस गैरहजर राहिले. तरीही, शासनाने संवेदनशीलता दाखवत बैठक पार पाडली आणि उपस्थित नागरिकांच्या भावना जाणून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.
शासन व JNPT कडून स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही बैठकीदरम्यान देण्यात आली.
Comments
Post a Comment