गुंदले गावात एंजल ॲल्युमिनियम कंपनीमुळे पूरस्थिती; ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा
गुंदले गावात एंजल ॲल्युमिनियम कंपनीमुळे पूरस्थिती; ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा
बोईसर– गुंदले येथील दिगी पाडा परिसरात ‘विजय लोढा उर्फ एंजल ॲल्युमिनियम कार्पोरेशन’ या कंपनीमुळे दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती ग्रामस्थांच्या जगण्यावर गदा आणत आहे. यंदाही पावसाने सुरुवात होताच अनेक घरांमध्ये व शेतीत पाणी घुसले असून, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी गढूळ झाल्या आहेत. परिणामी आरोग्याच्या समस्या उभ्या राहत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थानी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीच्या बांधकामामुळे नैसर्गिक नाल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कंपनीने कोणताही वैध लेआउट अथवा मंजुरी न घेता नैसर्गिक नाल्यावर थेट बांधकाम केले आहे. हा नाला पूर्वी रुंद होता आणि गावातील पाण्याचा नैसर्गिक निचरा या मार्गे होत असे. मात्र आता हा नाला अरुंद करण्यात आला असून, त्याचे पाणी गावात शिरते.
ग्रामपंचायत, पाटबंधारे विभाग तसेच कृषी विभाग यांच्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी करूनही कंपनीकडून केवळ आश्वासने मिळतात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना केली जात नाही.
यावर्षी पावसाची सुरुवात होताच दिगी पाडा येथील घरे व पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जर लवकरात लवकर नैसर्गिक नाल्याची पूर्ववत पुनर्बांधणी करण्यात आली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment