बोईसर घरफोडी प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत
बोईसर घरफोडी प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत
बोईसर – नवापुर नाका परिसरातील सिध्दीविनायक सोसायटी येथे ४ जुलै २०२५ रोजी दुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना आरोपीकडून चोरी केलेले दागिने घेणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकूण ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
या प्रकरणात तक्रारदार मंजुदेवी पुरोहीत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सुमारे ४ लाख ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू करत, हिस्ट्रीशीटर आरोपी धोनी ऊर्फ पाजी बच्चनसिंग सोडी (वय २२, रा. आझादनगर, बोईसर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीतील दागिने कार्तिक राकेश मारु (वय २२, रा. नालासोपारा पश्चिम) याच्याकडे दिल्याची कबुली दिली. त्यानंतर कार्तिक मारुलाही अटक करून चोरीस गेलेले साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
अटक आरोपी धोनी ऊर्फ पाजी सोडी याच्याविरुद्ध यापूर्वी ६ गुन्हे, तर कार्तिक मारु याच्याविरुद्ध १ गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
सदरची कारवाई ही पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पो.उप.निरीक्षक चंद्रकांत हाके, पो.उप.निरीक्षक विठ्ठल मणिकेरी, पो.हवा विजय दुबळा, पो.ना. रमेश पालवे, पो.ना. योगेश गावित, पो.अंम. मयुर पाटील, पो.अंम. देवेंद्र पाटील, पो.अंम. धिरज साळुंखे, पो.अंम. मच्छिंद्र घुगे, पो.अंम. गणेश व्हसकोटी आणि सायबर पोलीस ठाणे पालघरचे पो.अंम. जिग्नेश तांबेकर यांनी समन्वयाने काम करत तपासात मोलाची मदत केली. त्यांच्या प्रभावी कार्यवाहीमुळे गुन्हा उघडकीस येऊन चोरी गेलेले दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
Comments
Post a Comment