बोईसर वाहतूक मोकळी होणार ; रिक्षा व फेरीवाल्यांविरोधात प्रशासन सज्ज"
"बोईसर वाहतूक मोकळी होणार ; रिक्षा व फेरीवाल्यांविरोधात प्रशासन सज्ज"
बोईसर – बोईसरमधील नवापूर नाका परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवापूर नाक्यावर यापुढे फक्त आठ रिक्षांना निश्चित केलेल्या जागेतच उभे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी रेषांकन (मार्किंग) करून जागा निश्चित करण्यात आली आहे. ठराविक जागेबाहेर रिक्षा उभ्या आढळल्यास संबंधित चालकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बिकानेरजवळ नवापूर बाजूला रिक्षा उभ्या राहणार नाहीत, अशीही सूचना देण्यात आली आहे. यासंदर्भात दोन दिवसांची सूचना दिल्यानंतर थेट कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली.
याशिवाय, रस्त्यालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही दुकाने मांडण्यास मनाई करण्यात आली आहे. मार्केट परिसरात अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून अतिक्रमण काढले नाही तर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाईल.
वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नवापूर रोड ते रेल्वे स्टेशन, स्टेशन ते बस डेपो, बस डेपो ते ओसवाल चौक आणि नवापूर रोड ते तलाठी कार्यालय या मार्गांवरील नागरिक, वाहनचालक व व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या कारवाईदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक निरीक्षक सुरेश साळुंखे, संजय नांगरे आदी अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment