गुणवंतांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ – तारापूर मेडिकल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
गुणवंतांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ – तारापूर मेडिकल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
तारापूर – तारापूर मेडिकल वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मोहम्मद उर्दू शाळेतील जैनबिया हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मोफत वह्यांचे वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील होत्या.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तारापूर ग्रामपंचायतच्या सरपंच संध्या पागधरे, मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष शोएब अत्तारी, मोहम्मदवाला ट्रस्टचे सेक्रेटरी नासरुद्दीन सोपरकर, ग्रामपंचायत सदस्य जरीना दमणवाला, निलेश पाटील, इब्राहिम मेमन, अशरफ गवंडी, आवेश मेमन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुचिता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हिंदू-मुस्लिम ऐक्य हे तारापूरची ओळख आहे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य असून, जिद्द आणि सातत्य ठेवले तर कोणतेही शिखर गाठता येते.”
कार्यक्रमात 85% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रत्येकी दर महिन्याला 1,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला असून, वर्षभरात प्रत्येकी 12,000 रुपये वितरित केले जाणार आहेत. यासोबतच 150 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
सरपंच संध्या पागधरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात. मोफत शैक्षणिक साहित्यामुळे पालकांचा आर्थिक भार कमी होतो.” शोएब अत्तारी, अॅड. मेहविश बेंजी, प्राचार्य जावेद सर, तहसीन सिद्दिकी, गजाला शेख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले असून, यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवता येईल, असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष साबीर शेख यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान सिद्दिकी यांनी केले. तर नासिर शेख, इफ्तिकार तारापूरवाला, तौफिक शेख, रुबिना कौलारीकर, तबरेज शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment