११ लाखांचा अवैध दारू साठा वाहनासह जप्त; घोलवड पोलिसांची दमदार कारवाई
११ लाखांचा अवैध दारू साठा वाहनासह जप्त; घोलवड पोलिसांची दमदार कारवाई
पालघर : पालघर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीवर घोलवड पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ११ लाखांहून अधिक किमतीचा दारूसाठा आणि वाहन जप्त करत एकास अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
दिनांक ३० जून २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घोलवड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातून दमण बनावटीची अवैध दारू एका चारचाकी वाहनातून वेवजी-झाई मार्गे वाहून नेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वेवजी बावलपाडा (ता. तलासरी) येथे सापळा रचून संशयित क्रेटा गाडी (क्र. GJ15-CQ5695) थांबवली.
वाहनचालक मेहुनकुमार ईश्वर पटेल (वय २७, रा. उंबरगाव, जि. वलसाड, गुजरात) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यात २,०१,९६०/- रुपये किमतीच्या दमण बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. वाहनासह एकूण ११,७६,९६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी घोलवड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मेहुनकुमार पटेल यास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोहवा के.जी. पवार (घोलवड पोलीस ठाणे) हे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साहेबराव कचरे, पोउपनि परमेश्वर जाधव, पोहवा मनोज वरठा, पोअं. के.एम. शेख आणि पोअं. केशव कुंदर्गे यांनी संयुक्तरीत्या केली.
Comments
Post a Comment