बोईसर वाहतूक कोंडीवर निर्णायक पावले – प्रशासनाकडून उपाययोजनांना गती

बोईसर वाहतूक कोंडीवर निर्णायक पावले – प्रशासनाकडून उपाययोजनांना गती

बोईसर – बोईसर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन अधिक गंभीर झाले असून, उपाययोजनांच्या अंमलबजावणीत गती आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखा प्रभारी सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, बोईसर सरपंच दिलीप धोडी, सालवड सरपंच संजय पाटील, बोईसर उपसरपंच निलम संखे, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, रिक्षा-टॅक्सी संघटना, एमआयडीसी अभियंते, बसस्थानक प्रतिनिधी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या मागील चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणी आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बोईसर ग्रामपंचायतीने उघड्या गटारी बंद करून पदपथ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम निधीच्या मर्यादेत होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास अधिक लाभ होईल, असे उपसरपंच निलम संखे यांनी स्पष्ट केले.


बैठकीत रुग्णालये आणि शाळा परिसरात नो पार्किंग झोन निश्चित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गेल्या एक वर्षात पार्किंग व्यवस्थेसाठी बॅनर, गवंडी, फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली असून, सर्वांच्या सहमतीने हॉकर्ससाठी निश्चित जागा दिली गेली आहे. तरीही काही भागात अतिक्रमण व पदपथ अडवणारे फेरीवाले वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत.


बोईसरमध्ये सध्या दोन हजारांहून अधिक रिक्षा-टॅक्सी कार्यरत आहेत. अनियंत्रित परवाने व बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर नियंत्रणाची मागणी संघटनांकडून झाली आहे. विकास नाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की, यापुढे विना परवाना व परमीट कोणालाही सूट दिली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.


औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांमध्ये क्लिनर नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्यांच्या वाहनांचे रस्त्यावर पार्किंग ही वाहतूक कोंडीचे आणखी एक प्रमुख कारण बनले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील रखडलेली कामे आणि एसटी बसचालक भर रस्त्यावरच गाड्या थांबवून प्रवाशांची चढउतार करत असल्यामुळेही कोंडी वाढत आहे. तलाठी कार्यालयासमोर हातगाडीवाल्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही मांडण्यात आली.


सिडकोचा बाह्यवळण रस्ता जो दोन तालुक्यांना जोडणारा आणि जिल्हा कार्यालयाकडे जाणारा मार्ग आहे, तो सध्या प्रशासकीय अडचणीत अडकला आहे. सणासुदीला वाहतूक या रस्त्यावर वळवली जाते. उपसरपंच निलम संखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिडकोसोबत करार करून रस्त्याचे हस्तांतरण करण्याचे निवेदन दिले आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती विकास नाईक यांनी दिली.


बोईसरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात वाहतूक नियोजन ही काळाची गरज आहे. प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही समस्या निश्चितच सुटेल, अशी आशा बैठकीच्या शेवटी व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक