मोखाडा पोलीसांची मोठी कामगिरी : साडेचार लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक
मोखाडा पोलीसांची मोठी कामगिरी : साडेचार लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक
पालघर जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात कारवाईला वेग
पालघर – जिल्ह्यात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मोखाडा पोलीस ठाण्याने गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत सुमारे ४.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दिं. १० जुलै २०२५ रोजी मोखाडा पोलीसांना नाशिकहून जव्हारकडे जाणाऱ्या एका टाटा इंट्रा गाडीतून (MH-48-CQ-3034) गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
पवारपाडा गावाच्या हद्दीत नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी करत असताना संशयित गाडी थांबवण्यात आली. चालक मुजिब अजगर मनियार (वय ४८, रा. मेन रोड, मोखाडा) याने गाडीमध्ये कुरकुरे, गाद्या व पडदे असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली असता २,३४,२००/- रुपयांचा विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू आढळून आला. या गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली आहे.
सदर गुटखा व वाहतूक करणारी गाडी असा एकूण ४,८४,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ११८/२०२५ नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक पोकळे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, पो.उ.नि. श्रीकांत दहिफळे, पो.उ.नि. प्रतिक पोकळे, पो.ह.वा. भास्कर कोठारी, पो.शि. दत्तु पवार, पो.शि. राजगुरे (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) आणि मोखाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.
ही कारवाई जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांना मोठा इशारा ठरली असून पोलीस प्रशासन अशा कारवाया भविष्यातही सातत्याने राबवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Comments
Post a Comment