बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकार डळमळीत
बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकार डळमळीत
भाजपमधील अंतर्गत वादांमुळे नवे समीकरण उभे राहणार?
बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकारच्या स्थिरतेवर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी, आगामी काळात युती तुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली होती. सरपंचपदासाठी भाजपकडून दिलीप धोडी आणि सोनाली दुमाडा हे दोन उमेदवार मैदानात होते, तर बहुजन विकास आघाडीचे अनिल रावते यांनीही जोरदार लढत दिली होती. मोजणीत झालेल्या गोंधळानंतर अखेर हरकतीनंतर दिलीप धोडी यांची सरपंचपदी अधिकृत घोषणा करण्यात आली.
शिवसेनेच्या शिंदेगटाच्या निलम संखे यांची बिनविरोध सदस्य व उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर धोडी-संखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध विकासकामे राबवली. मात्र अलीकडे सरपंच धोडी यांची प्रकृती खालावल्याने कार्यभार प्रभारी सरपंच निलम संखे यांच्याकडे देण्यात आला.
दरम्यान, भाजपमधील दुसरा गट पुन्हा सक्रीय झाला असून, पूर्वी धोडी यांच्याविरोधात राहिलेले काही कार्यकर्ते आता त्यांच्याच बाजूने काम करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गोंधळ आणि निष्ठांमधील बदलामुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे.
भाजपमधील गटबाजी आणि वाढता असंतोष हे युतीच्या अस्थैर्याचे मुख्य कारण ठरत असल्याची चर्चा सध्या बोईसरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे 'युती टिकणार की तुटणार?' याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात ग्रामपंचायतीत नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment