पालघर जिल्हा पोलीस दलात 'Measurement Collection Unit (MCU)' चे उद्घाटन

पालघर जिल्हा पोलीस दलात 'Measurement Collection Unit (MCU)' चे उद्घाटन 

पालघर : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात आज एक नवा अध्याय जोडला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘Measurement Collection Unit (MCU)’ या अत्याधुनिक यंत्रणेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती संगीता शिंदे-अल्फोन्सो, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  प्रदीप पाटील व अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

देशभरातील गुन्हेगारी तपास अधिक वेगवान व अचूक करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने लागू केलेल्या Criminal Procedure (Identification) Act, 2022 अंतर्गत NCRB, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये MCU यंत्रणा सुरू केली जात आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अटक आरोपींच्या जैविक आणि भौतिक माहितीसह त्याचे रेटीना स्कॅन, हातापायांचे ठसे, शरीरावरील व्रण-खुणा, शरीराचे मोजमाप, सर्व बाजूंनी काढलेले फोटो व इतर वैयक्तिक माहिती संकलित केली जाते. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संबंधित तपासी अधिकाऱ्यांना तात्काळ ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे.


पूर्वी Identification of Prisoners Act, 1920 अंतर्गत फक्त शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात होती. मात्र, MCU यंत्रणा अधिक व्यापक स्वरूपात आरोपींची ओळख पटवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः वेषांतर किंवा चेहरा बदलून गुन्हा करणाऱ्या व्यक्तींची तात्काळ ओळख पटविण्यास ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. संकलित माहिती ही सुमारे ७५ वर्षे संगणकीय प्रणालीत सुरक्षितपणे साठवली जाणार आहे.


पालघर जिल्ह्यात ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्याने तपास प्रक्रियेला नवसंजीवनी मिळणार असून, जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी व्यक्त केला. उपस्थित अधिकाऱ्यांनी MCU च्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक