पंचाळी खाडीत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार
पंचाळी खाडीत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार
कारवाईसाठी प्रकरण उपप्रादेशिक अधिकारी तारापूर १ यांच्याकडे वर्ग
बोईसर : पंचाळी खाडी लगत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कारवाईसाठी प्रकरण उपप्रादेशिक अधिकारी तारापूर १ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
९ जून रोजी पंचाळी खाडीच्या परिसरात आगीचा धूर उठत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने बोईसर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी परिसरात औद्योगिक घनकचरा जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
घटनास्थळी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, हा घनकचरा स्टॅंडर्ड ग्रीस या औद्योगिक कंपनीचा असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बोईसर पोलिसांनी उपप्रादेशिक अधिकारी तारापूर २ यांना पत्र पाठवून चौकशी व कारवाईची मागणी केली होती.
यानंतर उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांनी सदर प्रकरणाचा तपशील उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे (तारापूर १) यांच्याकडे वर्ग केला असून, पुढील चौकशी व आवश्यक कारवाई अपेक्षित आहे.
दरम्यान, पंचाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
या घटनेमुळे औद्योगिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने योग्य ती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment