बोईसरमध्ये डिजिटल वीज मीटर बसवण्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध — ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

बोईसरमध्ये डिजिटल वीज मीटर बसवण्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध — ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात वीज वितरण कंपनीकडून नागरिकांच्या संमतीशिवाय डिजिटल वीज मीटर बसवण्याच्या प्रकाराला ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर ग्रामपंचायतीच्या दि. ११ जून रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करत वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.

सरपंच नीलम संखे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या. त्यांनी स्पष्ट सांगितले की, पालघर हा आदिवासी आणि डोंगरी भाग असून, अनेक गावांमध्ये अद्यापही मोबाईल नेटवर्क आणि स्मार्टफोनची सुविधा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत डिजिटल मीटरसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक अटी पूर्ण करणे सामान्य जनतेला शक्य नाही.


यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, वीज कायदा २००३ च्या कलम ४७(५) नुसार ग्राहकांना मीटर निवडण्याचा हक्क असूनही, त्यांना विश्वासात न घेता अनेक ठिकाणी जुन्या मीटरऐवजी नव्या डिजिटल मीटरची जबरदस्तीने बसवणी केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये तर ग्राहक घरी नसताना हे मीटर बसवले गेले आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला.


या प्रकरणी बोईसर ग्रामपंचायतीमार्फत वीज वितरण कंपनीच्या पालघर येथील अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.


या संपूर्ण घडामोडींमुळे बोईसर परिसरात वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत असून, प्रशासनाने त्वरित लक्ष घालून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आता सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक