बोईसरमध्ये खड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
बोईसरमध्ये खड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
बोईसर – बोईसरमधील गणेशनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणेशनगर झोपडपट्टीत राहणारी चार अल्पवयीन मुले दुपारी सुमारास घराशेजारी असलेल्या मोकळ्या व खाजगी जागेतील खड्ड्यात पोहण्यासाठी गेली होती. खड्ड्यात पाणी साचलेले असून अंदाजे एक ते दीड वाजेदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पोहताना तीन मुले खोल पाण्यात बुडाली, तर एका मुलाला बाहेर पडण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस व तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत तीन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह पुढील तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व शोक व्यक्त होत असून संबंधित खड्डा खुला का ठेवण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी तत्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment