पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली
पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली
पालघर – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने ही मोहिम प्रभावीपणे पार पडली.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, व्यसनमुक्ती केंद्रे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी जनजागृती सत्रे आयोजित करण्यात आली. शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅली काढून “नशा मुक्त समाज” या उद्देशाने घोषणा देत लोकांमध्ये सजगता निर्माण केली.
या अभियानादरम्यान बस स्थानक, रेल्वे स्टेशन, झोपडपट्ट्या, मोहल्ले, बाजारपेठा तसेच औद्योगिक भागामध्ये बॅनर, फलक, पोस्टर आणि होर्डिंग्ज लावून अंमली पदार्थांच्या विघातक परिणामांची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हातात फलक घेऊन मार्गदर्शन करत अनेक नागरिकांशी थेट संवाद साधला. तसेच काही ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये व्याख्याने आयोजित करून नागरिकांना कायदेशीर बाबींची माहिती देण्यात आली.
अभियानात सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, सहकारी संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग दिसून आला. त्यांनी पोलिसांना सहकार्य करत विविध भागांमध्ये स्वतंत्र पातळीवर जनजागृती उपक्रम राबवले. या एकत्रित प्रयत्नांमुळे अंमली पदार्थांविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सांगितले की, "अंमली पदार्थांचे व्यसन ही वैयक्तिक समस्या नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाला वेढणारी आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच प्रत्येक नागरिकाने यात सक्रीय सहभाग घ्यायला हवा. आपल्याला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असून पालघर जिल्हा 'नशा मुक्त' व्हावा हा या मोहिमेचा प्रमुख हेतू आहे."
ही जनजागृती मोहीम पालघर पोलीस दलासाठी केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता, सतत चालणाऱ्या सामाजिक जबाबदारीचा भाग ठरावी, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment