कासा-चारोटी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट — खत विक्रेत्यांचा अतिरेक; प्रशासन गप्प
कासा-चारोटी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट — खत विक्रेत्यांचा अतिरेक; प्रशासन गप्प
डहाणू : तालुक्यातील कासा-चारोटी ही बाजारपेठ परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीसामग्री खरेदीसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. घोळ, तवा, धामटणे, नानिवली, वेती, वधना, धानीवरी, धरमपूर आदी गावांतील शेतकरी खतं, बी-बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी या ठिकाणी नियमितपणे येतात. मात्र या परिसरात काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असून, छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचा आरोप उघड झाला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, युरिया खताची छापील किंमत २६६ रुपये असूनही, दुकानदार २८० ते ३०० रुपये आकारतात. काही दुकानदार तर पावतीही देत नाहीत, त्यामुळे कोणतीही ठोस पुरावा न राहता शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. डीएपी, कंपोस्ट व इतर खतांबाबतही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
धानिवरी येथील शेतकरी शैलेश तांबडा यांनी सांगितले, "मी कासा येथील भरत कृषी सेवा केंद्रात खत खरेदीसाठी गेलो असता, दुकानदाराने जबरदस्तीने बी-बियाणे घेण्यास भाग पाडले. मी नकार दिल्यावर त्याने दादागिरी केली."
या साऱ्या प्रकारांबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असल्या तरी त्या केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर. बी. ईभाड यांनी सांगितले की, "खत विक्रीत छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तक्रार मिळाल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
शासनाच्या उदासीनतेमुळे खत विक्रेत्यांची मक्तेदारी बळावली असून, आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची पिळवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारांना चाप लावण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment