मनोर पोलीस ठाणे मार्फत जनसंवाद अभियानाअंतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न
मनोर पोलीस ठाणे मार्फत जनसंवाद अभियानाअंतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न
सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, बालविवाहमुक्त भारत यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पालघर : मनोर पोलीस ठाण्याच्या वतीने "जनसंवाद अभियान" अंतर्गत लालबहादूर शास्त्री विद्यालय, मनोर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सायबर गुन्हे, महिला व बालकांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, डायल ११२ सेवा यासारख्या महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यशाळेमध्ये "गुड टच - बॅड टच", बालविवाह मुक्त भारत आणि महिला सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोलिसांशी थेट संवाद साधत आपले अनुभव, शंका व अडचणी मांडल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं देत मार्गदर्शन केलं.
यावेळी सायकलवरून भारतभ्रमण करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गिर्यारोहक समीरा खान यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती दिली आणि नव्या पिढीला ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यशाळेत २०० ते २५० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. हे संपूर्ण आयोजन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस व मनोर पोलीस ठाण्याच्या पथकाने केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन सामाजिक भान जागृत झाले असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व पालकांनी दिली.
Comments
Post a Comment