पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांतील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांतील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू
सर जे. जे. रुग्णालय व जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
या उपक्रमांतर्गत सर्व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या तपासणीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचा बारकाईने आढावा घेण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार उपचार आणि पुढील वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे.
आज नंडोरे आश्रमशाळेत झालेल्या पहिल्या शिबिरात एकूण 500 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पालघर ही संस्था सन 1956 पासून कार्यरत असून, जिल्ह्यातील प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातूनच या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, हा उपक्रम एकदाच न राहता वेळोवेळी सातत्याने राबवण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माते आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर डॉक्टर्स यांचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय TACR या स्वयंसेवी संस्थेचेही सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिरात उपजिल्हाधिकारी महेश सागर, सर जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, प्राध्यापक डॉ. गीता परदेशी, डॉ. राकेश वाघमारे यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
◾डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त आणि सुरक्षित राहावे, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एकूण शारीरिक व मानसिक आरोग्याची गुणवत्ता वाढेल आणि शिक्षणातील सहभागही प्रभावी ठरेल.
Comments
Post a Comment