पंचाळीत औद्योगिक घनकचऱ्याच्या ढिगास भीषण आग
पंचाळीत औद्योगिक घनकचऱ्याच्या ढिगास भीषण आग
औद्योगिक घनकचऱ्याच्या चोरट्या विल्हेवाटीचा पर्दाफाश; स्टॅंडर्ड ग्रीस कारखान्यावर संशयाची सुई
बोईसर : पंचाळी ग्रामपंचायत हद्दीतील विचारे कन्स्ट्रक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खाडीच्या किनाऱ्यावर रविवारी (दि.९) सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे उठणाऱ्या काळसर धुरामुळे आणि उग्र वासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बोईसर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. तपासणीदरम्यान आढळून आले की, घटनास्थळी जळलेल्या कचऱ्यात स्टॅंडर्ड ग्रीस कंपनीचे प्रिंटेड प्लास्टिक कंटेनर व लेबर कागदपत्रांचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे हा घनकचरा स्टॅंडर्ड ग्रीस या कारखान्याचा असल्याचा संशय आहे.
बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून दोन गोण्या काळ्या रंगाच्या रासायनिक पदार्थांचे नमुने जप्त केले असून, ते पुढील तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांच्याकडे पाठवले आहेत.
👉 उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह म्हणाले, "बोईसर पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. संबंधित कचरा स्टॅंडर्ड ग्रीस कारखान्याशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक पत्रव्यवहार सुरू आहे."
👉 सरपंच सुजाता पाटील यांनी सांगितले, "पंचाळी परिसरात औद्योगिक घनकचरा खाडी व मोकळ्या जागांमध्ये टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी आणि पर्यावरण विभागाने यावर तातडीने कारवाई करावी."
या घटनेमुळे औद्योगिक घनकचऱ्याच्या बेकायदेशीर विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिकांनी संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी व नियंत्रण यंत्रणांनी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Comments
Post a Comment