तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहतूक टँकर्सवर ३१ मे पासून बंदी

 तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहतूक टँकर्सवर ३१ मे पासून बंदी

जलप्रदूषणावर नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई



बोईसर : औद्योगिक सांडपाण्याच्या अवैध विल्हेवाटीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठोस पावले उचलली असून, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) टँकरद्वारे होणाऱ्या सांडपाणी वाहतुकीवर ३१ मे पासून बंदी लागू केली आहे.


सद्यस्थितीत टीईपीएस या खाजगी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सीईटीपी प्रकल्पात रोज सुमारे २५ दशलक्ष लिटर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते ७.१ किमी लांबीच्या वाहिनीद्वारे नवापूर जवळील खोल समुद्रात सोडले जाते. या प्रकल्पाची एकूण क्षमता ५० दशलक्ष लिटर असून, जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प कार्यरत आहे.


मात्र, टँकरच्या माध्यमातून सांडपाणी वाहतूक करताना प्रक्रिया आणि नोंदवहीत अनियमितता होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आल्याने ही बंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत टीईपीएस संस्थेला १६ मे रोजी अंतरिम सूचना देत ३१ मे पर्यंत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार, यापुढे सांडपाणी केवळ एमआयडीसीच्या अधिकृत वाहिनीद्वारेच सीईटीपीपर्यंत पोहोचवले जाईल. यामुळे सांडपाण्याच्या अवैध वाहतूक आणि विल्हेवाटीला चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


उपाययोजना आणि अधिक सूचनाः

मंडळाने औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देशही दिले आहेत –


◾एमआयडीसीने सांडपाणी वाहून नेणाऱ्या नादुरुस्त वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

◾सर्व कारखान्यांनी औद्योगिक सांडपाणी स्काडा प्रणालीद्वारे नियमितपणे देखरेखीखाली ठेवावे आणि त्याचा ◾दैनंदिन अहवाल MPCB ला सादर करावा.

◾सांडपाण्याचे नमुने सीईटीपीने नेमलेल्या थेट अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फतच गोळा करावेत.

◾कारखान्यांमधून पाईपद्वारे चेंबरमध्ये सोडले जाणारे सांडपाणी योग्यरीत्या तपासले जावे.


सध्या सीईटीपीमध्ये राजकीय पक्षांशी संबंधित १३ टँकर्सद्वारे सांडपाणी वाहतूक केली जात असल्याचे समजते. टँकर बंदीमुळे या साखळीस आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.


◾"तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषणास जबाबदार व अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर कठोर कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. सर्व उद्योग, एमआयडीसी, सीईटीपी यांनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे तंतोतंत पालन करावे," — राजू वसावे, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर-१



Comments

Popular posts from this blog

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू