संपलेला भाडेकरार ठरला फसवणुकीचा मार्ग; दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल"
संपलेला भाडेकरार ठरला फसवणुकीचा मार्ग; दोन जणावर विरोधात गुन्हा दाखल"
पालघर – पालघरमधील वाढत्या भूखंड फसवणूक प्रकरणांत आणखी एका नव्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. संपलेला भाडेकरार असूनही गाळ्यावर परस्पर कब्जा करत, तिसऱ्या व्यक्तीस लाखो रुपयांच्या मोबदल्यात जागा भाड्याने देणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात पालघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मूळ जागाधारकास अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत दबाव टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
कैफ परवेज खान (वय २४), व्यवसायाने व्यापारी, राहणार टेंभोंडे रोडवरील रामकृष्ण गार्डन येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी सर्व्हे नं. ११६/१ मधील एकूण ९५०० स्क्वेअर फूट गाळ्यातील २५०० स्क्वेअर फूट जागा राज प्रभाकर टेंभेकर या इसमास पाच वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. हा करार ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झाला.
करार संपल्यानंतर खान कुटुंबाने जागेवर कायदेशीर कुलूप मारून त्यावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती. मात्र, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, आरोपी राज प्रभाकर टेंभेकर व सहकारी निलम जाधव (पूर्ण नाव अजून अस्पष्ट) यांनी त्या जागेवर परस्पर ताबा मिळवत, ती जागा शिवाजी भाऊसाहेब खेडकर या इसमास ५.८५ लाख रुपयांमध्ये भाडे तत्वावर दिली. हा व्यवहार पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट असून, मूळ मालकाच्या परवानगीशिवाय तिसऱ्याला जागा देणे हे फसवणुकीच्या गुन्ह्यात मोडते. इतकेच नव्हे, तर या प्रकरणात कैफ खान यांना अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली, जेणेकरून ते या विषयावर गप्प राहावेत.
पोलिसांनी कैफ खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १९२९/२०२५ नोंदवला असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३३३, ३५२, ३५१(२), ३२४(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पालघर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Comments
Post a Comment