तारापूर एमआयडीसीतील घातक रसायन विल्हेवाट प्रकरण उघड ; स्थानिक नागरिकांची कठोर कारवाईची मागणी
तारापूर एमआयडीसीतील घातक रसायन विल्हेवाट प्रकरण उघड ; स्थानिक नागरिकांची कठोर कारवाईची मागणी
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यातून निघालेला रसायन भरलेला टँकर बेकायदेशीरपणे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या टँकरला बोईसर पोलिसांनी खैरापाडा तपासणी नाक्यावर थांबवून ताब्यात घेतले आहे.
एम.एच.०४ डी.एस.९६२८ क्रमांकाचा हा टँकर मंगळवारी दुपारी चिल्हार रस्त्यावर संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता, चालकाकडे रसायन वाहतुकीसाठी आवश्यक कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरमधील रसायनाचे नमुने ताब्यात घेतले असून, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, हा टँकर निर्जन स्थळी, नैसर्गिक नाल्यात किंवा समुद्रकिनारी हे घातक रसायन टाकण्यासाठी नेला जात होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. टँकरचा चालक आणि मालक यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे मोठ्या प्रमाणावर बेकायदा रसायन विल्हेवाट रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
◾तारापूर एमआयडीसीतील काही उद्योग उच्च सीओडी आणि टीडीएसयुक्त रासायनिक सांडपाणी बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावण्यासाठी राजकीय पाठबळाचा वापर करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या रसायनांचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडण्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून, मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत, शेती नापीक होत आहे आणि पिण्याचे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकारांबाबत यापूर्वीही नागरिकांनी तक्रारी केल्या असून, आता या बेकायदेशीर कारवायांवर कठोर आणि ठोस कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुन्हा एकदा उचलून धरली जात आहे.
◾यापूर्वीही अशा प्रकारचे घातक रसायने वाहून नेणारे टँकर प्रशासनाच्या ताब्यात आले होते, परंतु त्या प्रकरणांमध्ये कारवाई केवळ कागदोपत्री मर्यादित राहिल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांतच ती वाहने पुन्हा सोडून दिली जात असल्याने संबंधितांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, हे सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यामुळे या टँकरच्या प्रकरणातही अशीच ढिलाई दाखवली जाणार का, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.
◾टँकरमध्ये आढळलेलं रसायन अत्यंत घातक स्वरूपाचं असल्याचं समोर आलं असून, ते जर पाण्यात मिसळलं असतं तर पर्यावरणासह जनतेच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. तज्ज्ञांनी या रसायनामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका संभवतो, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ वाहनचालकाच्या जबाबदारीपुरते मर्यादित न राहता, संबंधित रासायनिक कारखाना आणि रसायन माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची तीव्र आणि ठाम मागणी होत आहे.
Comments
Post a Comment