पालघर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; ७६७ घरांचे व डहाणूमध्ये ५० बोटींचे नुकसान
पालघर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; ७६७ घरांचे व डहाणूमध्ये ५० बोटींचे नुकसान
पालघर: ६ मे २०२५ रोजी पालघर जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसामुळे विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून डहाणू तालुक्यातील मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण ७६७ घरांचे नुकसान झाले असून डहाणूमध्ये ५० मच्छीमारी बोटीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
तालुकानिहाय नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
वाडा – ९२ घरांचे नुकसान
वसई – २९ घरांचे नुकसान
जव्हार – ८९ घरांचे नुकसान
मोखाडा – ८७ घरांचे नुकसान
पालघर – ८५ घरांचे नुकसान
विक्रमगड – ९२ घरांचे नुकसान
डहाणू – २३० घरांचे नुकसान आणि ५० बोटी
तलासरी – ६३ घरांचे नुकसान
डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू परिसरात विशेष नुकसान
डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू परिसरात ४० ते ५० मच्छीमारी बोटी आणि १० ते १२ घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी महेश सागर, दिनेश पाटील, उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग व तहसीलदार सुनिल कोळी यांनी नुकसानीच्या भागाला भेट दिली.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मच्छीमार बांधवांची भेट घेतली व त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी महेश सागर यांनी सांगितले की, शासनामार्फत नियमानुसार नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत लवकरच दिली जाईल.
सदर नुकसानीचे पंचनामे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग आणि महसूल प्रशासनाच्या पथकांमार्फत करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदतीसाठी हालचाली सुरू केल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment