रासायनिक माफियांविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
रासायनिक माफियांविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
"खैरापाडा नाक्यावर रसायनवाहक टँकर पकडला; कठोर कारवाईची मागणी"
बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीसह बोईसरच्या परिसरात वाढत्या बेकायदेशीर रासायनिक टाकावूच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. यामुळे परिसरातील पर्यावरण, भूजल स्रोत आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिवसेनेचे गंभीर आरोप
शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलम संखे, शहरप्रमुख अतुल देसाई, विभागप्रमुख अजय दिवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही रासायनिक माफिया नदी, नाले व झाडीत खुलेआम घातक केमिकल टाकत आहेत. त्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होत असून जैवविविधतेवर घातक परिणाम होत आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अलीकडेच एका ट्रकमधून केमिकल टाकताना काही व्यक्ती पकडल्या गेल्या तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
शिवसेनेच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
◾दोषींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
◾अनधिकृत रसायन वाहतूक करणारी वाहने त्वरित जप्त करून कठोर दंडात्मक कारवाई करावी.
◾संबंधित परिसराची तात्काळ तपासणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबवाव्यात.
◾भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थायी निगराणी यंत्रणा स्थापन करावी.
तक्रारीची लेखी पावती आणि पुढील कारवाईचा तपशील लेखी स्वरूपात देण्यात यावा तसेच या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत.
◾बोईसर आणि तारापूर परिसरातील रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रासायनिक माफियांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज बनली आहे.
Comments
Post a Comment