डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला
डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला
डहाणू : डहाणू तालुक्यातील वाघाडी गावाजवळील प्रसिद्ध भीम बांधावर गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. मीना पऱ्हाड (वय ३९, रा. धानिवरी, डहाणू) या महिला पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल १८ तासांच्या अथक शोधानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व पाणबुड्यांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवली गेली. अखेर शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडून तो कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. स्वविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
सुरक्षेअभावी पर्यटनस्थळ धोकादायक
भीम बांध हे डहाणूतील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देतात. मात्र, या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. पाण्याचा प्रवाह तीव्र असून खोलीही ४० ते ५० फूटपर्यंत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. चेतावणी फलक, जलरक्षक, वा सुरक्षारक्षकांची येथे कोणतीही सुविधा नाही.
घटनांची पुनरावृत्ती, तरीही दुर्लक्ष
या घटनेपूर्वीही भीम बांधावर अशा प्रकारचे अपघात झाले असून मृत्यूच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत, हे विशेष.
स्थानीय नागरिकांची मागणी तीव्र
स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून मागणी करण्यात येत आहे की भीम बांधासारख्या ठिकाणी तात्काळ चेतावणी फलक लावावेत, जलरक्षक नेमावेत आणि सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
नागरिकांची प्रतिक्रिया
"निसर्गसंपन्न पर्यटनस्थळांवर नागरिकांनी स्वतःची सुरक्षा जपली पाहिजे. मात्र प्रशासनानेही जबाबदारी घेतली पाहिजे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडतील," अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment