पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिन, कामगार दिन आणि महापुरुष जयंतीचा गौरवशाली सोहळा

पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिन, कामगार दिन आणि महापुरुष जयंतीचा गौरवशाली सोहळा

पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली बहुजन शक्तीचा भव्य जागर


पालघर
– राष्ट्रीय पँथर्स आघाडी आणि राष्ट्रीय पँथर्स आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 1 मे 2025 रोजी चिंतामणी मंगल कार्यालय, जिल्हा पालघर येथे संघटनेचा तृतीय वर्धापन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती, देशातील तमाम महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात व उत्सवमूर्ती वातावरणात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक व सर्वेसर्वा पँथर अविश राऊत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातून, तसेच विविध तालुक्यांमधून हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पँथर अविश राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रीय पँथर्स आघाडी ही संघटना केवळ संघटना नसून एक संविधानिक लढ्याची चळवळ आहे. विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करत संविधानातील मूल्ये – समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय – या तळागाळातील वंचित, शोषित आणि पीडित जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”


यावेळी त्यांनी संविधान हा संघटनेचा आत्मा असल्याचे ठामपणे सांगितले. “सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या समूहांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे हे संघटनेचे प्रथम कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



कार्यक्रमात विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन 2020 मध्ये बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा देताना समर्पण व त्याग करणाऱ्या 20 कार्यकर्त्यांना
‘शूर भीमसैनिक पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले.


तसेच, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘बहुजन समाजभूषण पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.


कार्यक्रमाचा एक विशेष भाग ठरला तो ‘आदर्श ग्राम पुरस्कार 2025’. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मौजे टेंभोडे या गावाची निवड करण्यात आली. गावाने सामाजिक विकास, स्वच्छता, एकता आणि लोकसहभागाच्या माध्यमातून इतर गावांसाठी आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या गावाचा सन्मान करत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



या भव्य सोहळ्यात
राष्ट्रीय कोर कमिटी, संयोजक समितीचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सदस्य, विभागीय व शाखा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांचे संयोजन, समन्वय आणि परिश्रम यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीने विशेष मेहनत घेतली. उत्सवमूर्ती वातावरण, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक बांधिलकी आणि संघटनात्मक शक्ती याचे जिवंत चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक