डहाणूत आरोग्य व्यवस्थेचे बळी ठरले आई आणि बाळ
डहाणूत आरोग्य व्यवस्थेचे बळी ठरले आई आणि बाळ
डहाणू – डहाणू तालुक्यातील कैनाड वाडुपाडा येथे रविवारी (दि. २७ एप्रिल) घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण तालुक्याला हादरवून गेली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सायनु जितेश सावर (वय २५) या गरोदर महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे आदिवासी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सायनु ही आपल्या माहेरी कैनाड वाडुपाडा येथे राहत होती. तिचा पती मासेमारीसाठी समुद्रात तर सासू-सासरे मजुरीसाठी बाहेरगावी गेलेले असल्याने ती एकटीच माहेरी होती. गर्भधारणेच्या काळात तिने स्थानिक आरोग्य केंद्रात तब्बल सहा वेळा तपासण्या केल्या होत्या. त्यानंतरही प्रसूतीच्या निर्णायक क्षणी तिला वेळेवर आवश्यक आरोग्य सेवा मिळाल्या नाहीत.
रविवारी सकाळी १० वाजता तिला प्रसववेदना सुरू झाल्यानंतर भाऊ रत्नाकर म्हशा यांनी तिला तातडीने रिक्षाने आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तिची स्थिती गंभीर असल्यामुळे तिला तत्काळ डहाणू उपजिल्हा (कॉटेज) रुग्णालयात हलवण्यात आले. दुपारी २ वाजता तिची सामान्य प्रसूती झाली आणि २.३५० किलो वजनाचे बाळ जन्माला आले. दुर्दैवाने काही मिनिटांतच नवजात बाळाने प्राण सोडले.
प्रसुतीनंतर सायनुच्या शरीरातून तीव्र रक्तस्राव सुरू झाला. तिचा हिमोग्लोबिन स्तर केवळ ६.५ एवढा असल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर बनत चालल्यामुळे डॉक्टरांनी तिला वलसाड येथील प्रगत उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, सरकारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. सायंकाळी ५ वाजता रुग्णवाहिका मिळाल्यानंतर तिला वलसाडकडे हलवण्यात आले, पण वाटेतच सायनुचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती, प्रसूतीदरम्यान रक्ताची व्यवस्था करण्यात आली असती, तर सायनु आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले असते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “योग्य वेळेत आरोग्य सेवा मिळाल्या असत्या, तर माझी बहीण आणि तिचे बाळ वाचले असते,” अशी भावनिक प्रतिक्रिया रत्नाकर म्हशा यांनी दिली.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील गोंधळ, निष्काळजीपणा आणि साधनसुविधांचा अभाव अधोरेखित केला आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे, याबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.
आरोग्य खात्याने तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कैनाड परिसरातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सरकारी योजना केवळ कागदोपत्रीच राहिल्या असून, प्रत्यक्षात आरोग्य सेवा वेळेवर न मिळाल्यास त्याचा गंभीर परिणाम कुटुंबांवर होत आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment