विकासाच्या नावाखाली नागरिकांचे जीव धोक्यात
विकासाच्या नावाखाली नागरिकांचे जीव धोक्यात
बोईसर-नानीवली-बर्हाणपूर एसटी सेवा ठप्प – अपूर्ण रस्त्याचे नागरिकांना चटके
बोईसर : बोईसर नानीवली ते बर्हाणपूर दरम्यान गेल्या चार दिवसांपासून एसटी बस सेवा पूर्णतः ठप्प झाली असून, त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, बाजारासाठी प्रवास करणारे नागरीक आणि रोजंदारी करणाऱ्या कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्याचे मुळ कारण म्हणजे नागझरी रावते मार्गावरील अपूर्ण व बेजबाबदार रस्त्याचे काम.
शिवसाई कन्स्ट्रक्शन नावाच्या ठेकेदाराने सुरु केलेले रस्त्याचे काम पूर्णतः धोकादायक व निकृष्ट दर्जाचे असून, त्यातूनच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ही अवस्था अधिकच बिकट केली असून, केवळ एसटीच नव्हे तर दुचाकी वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली आहे. अनेक चारचाकी वाहने रस्त्यातच अडकली असून, प्रवाशांना चिखलातून चालत प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले असून, "अशा बिनडोक ठेकेदारांपेक्षा खड्डेमय रस्तेच बरे!" अशी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर आणि गावसभांमध्ये ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांवर टक्केवारीच्या राजकारणाचे आरोप करत, या सगळ्या हलगर्जीपणामागे भ्रष्ट व्यवहार असल्याचा आक्षेप घेतला आहे.
अधिकाऱ्यांचा बेजबाबदार सल्ला: "मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे वापरा" असा सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही लोकांमध्ये चीड आहे. "गरिबांसाठी एक्सप्रेसवे नाही, आम्हाला आमचा मुलभूत रस्ता हवा आहे," अशी रोषपूर्ण मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पर्यायी रस्ते नाहीत, काम अपूर्ण, प्रशासन मौन: या मार्गावर कुठलाही पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक अक्षरशः कोंडीत सापडले आहेत. कामाचा हलगर्जीपणा, नियोजनशून्यता आणि अधिकाऱ्यांची बेफिकिरी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
तत्काळ हस्तक्षेपाची मागणी: या संपूर्ण परिस्थितीत पालघर जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून, दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, रस्ता तत्काळ चालू करावा, आणि प्रवाशांसाठी वैकल्पिक वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment