बोईसर गुटखामुक्त की गुटखाग्रस्त? – अमनच्या टोळीचं उघडं कारस्थान
बोईसर गुटखामुक्त की गुटखाग्रस्त? – अमनच्या टोळीचं उघडं कारस्थान
बोईसर : राज्य सरकारने गुटख्यावर घातलेली बंदी केवळ कागदावरच उरली असून, बोईसर शहरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. 'दमण पॅटर्न'च्या धर्तीवर अमन नावाच्या गुटखा माफियाने संपूर्ण शहरात आपले जाळे पसरवले आहे. किराणा दुकानांच्या आडून, तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमधून सर्रास गुटखा विक्री सुरू आहे.
गुजरातहून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करून तो बोईसरमध्ये आणला जातो आणि इथे डबल-तिब्बट दराने विकला जात आहे. मुख्य रस्त्यांपासून ते औद्योगिक क्षेत्र आणि बाजारपेठांपर्यंत, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन टपऱ्या उभ्या राहत असून, स्थानिक तरुणांना या व्यसनाच्या विळख्यात ओढलं जात आहे.
या अवैध व्यवहारात चौरसिया, सोनू खान, तिवारी यांसारख्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग असून, स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली गेली असली तरी, अमनसारख्या माफियांनी नव्या स्वरूपात गुटख्याचा पुरवठा सुरूच ठेवला आहे.
गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, पचनाच्या समस्या, आणि इतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला असून, अमन आणि त्याच्या टोळीवर कठोर कारवाई करावी, तसेच गुटख्याच्या विक्रीवर तातडीने बंदी आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, बोईसर शहर कायमचे गुटख्याच्या विळख्यात अडकून पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment