जबरी चोरी प्रकरण उघड – सख्ख्या भावानेच रचला लुटीचा कट, चार आरोपी अटकेत!

जबरी चोरी प्रकरण उघड – सख्ख्या भावानेच रचला लुटीचा कट, चार आरोपी अटकेत

पालघर – जव्हार येथे गाडी अडवून चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत तब्बल ६.८५ लाख रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, यात फिर्यादीच्याच भावाचा सहभाग उघडकीस आला आहे.

◾काय आहे प्रकरण?


दिनांक २८ मार्च २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता, फिर्यादी भोरू खंडू बिन्नर (वय ३०, रा. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर) हे त्यांच्या पिकअप गाडीने प्रवास करत असताना वावर गावच्या हद्दीत तीन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले. "आमची गाडी बंद पडली आहे, मदत करा" असे सांगत असताना, त्या इसमांनी चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि कोयत्याचा धाक दाखवत गाडीतील ६,८५,५००/- रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.


या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


◾पोलिसांची शिताफीने केलेली कारवाई


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जलद तपासाच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.


पथकाने घटनास्थळी जाऊन तांत्रिक तपास केला असता, आरोपींनी मिरचीपूड एका लग्नपत्रिकेत आणल्याचे आढळले. याच सुगावाटीच्या आधारे पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना शोधून काढले.


◾अटक आरोपींची नावे –


१) दत्तू खंडू बिन्नर (वय ३४, रा. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर) 

२) परमेश्वर कमलाकर झोले (वय २४, रा. धाडोशी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)

 ३) दादा बाजीराव पेहरे (वय २४, रा. भिलमाळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) 

४) किरण अनंता लामठे (वय २३, रा. भुरीटेक, ता. मोखाडा, जि. पालघर)


◾भाऊच निघाला कटातील सूत्रधार!


तपासादरम्यान फिर्यादीचा भाऊच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. आरोपी क्रमांक १ दत्तू बिन्नर याने इतर आरोपींना सोबत घेत भाऊलाच लुटण्याचा कट रचला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून चोरीस गेलेली ६.८५ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.



या कारवाईसाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भुसाळ, तसेच पोलिस कर्मचारी दिघोळे, प्रदीप विटकर, गायकवाड, नेहरे आणि सचिन भुसारा यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली, तरी पोलिसांच्या जलद तपासामुळे अवघ्या काही तासांत आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भुसाळ करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक