आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना गृहपाठ न केल्यामुळे अमानुष शिक्षा

आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना गृहपाठ न केल्यामुळे अमानुष शिक्षा

पालघर : वसई तालुक्यातील बेलवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील चौथी इयत्तेतील विद्यार्थिनींना गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने अमानुष शिक्षा दिली आहे. यामुळे विद्यार्थिनींना शारीरिक त्रास सहन करावा लागला असून स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने शंभर पेक्षा जास्त उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेने विद्यार्थिनींचे पाय सुजले असून त्यांना चालण्यात अडचणी येत आहेत. शिक्षिका आणि शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनींना दवाखान्यात नेले.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी मुलींच्या कुटुंबीयांना संपर्क साधला आणि परिस्थितीची गंभीरतेची माहिती घेतली. कुटुंबीयांनी शाळेतील शिक्षिकेशी संपर्क साधला असता, शिक्षिकेने उडवाउडवीची उत्तरे दिली.


यांनतर कुटुंबीयांनी शनिवारी शाळेत जाऊन मुलींची चौकशी केली असता मुलींना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यांनतर कुटुंबीयांनी मुलींना घरी आणले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न आहे. घटनेला चार दिवस उलटून देखील विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना चालण्यासाठी अडचण होत असल्यामुळे कुटुंबीयांना त्यांची काळजी घ्यावी लागत आहे. मुलींना अमानुष शिक्षा दिल्यामुळे संबंधीत शिक्षिकेला देखील कठोर शिक्षा करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.


स्थलांतर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी शासनाने आदिवासी मुलांसाठी शासकीय आश्रमशाळा उभारल्या आहेत. या शाळांमध्ये राहणाऱ्या मुलांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र स्थानिक पातळीवर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. 


या प्रकरणी एका मुलीचे पालक संदीप तल्हा म्हणाले की, "आम्ही वीटभट्टीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो. आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या भरवशावर शाळेत ठेवले. मात्र शिक्षिकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे." 


प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पालकवर्ग आणि स्थानिक समाजाने शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे, आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि वागणुकीच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक