महालक्ष्मी यात्रेत दुर्दैवी घटना : डोंगर चढताना भाविकाचा पाय घसरून मृत्यू
महालक्ष्मी यात्रेत दुर्दैवी घटना : डोंगर चढताना भाविकाचा पाय घसरून मृत्यू
डहाणू : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या भव्य आणि पारंपरिक यात्रोत्सवाला १२ एप्रिल रोजी जल्लोषात सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनेने यात्रेच्या आनंदावर पाणी फेरले. महालक्ष्मीच्या सुळका डोंगरावर चढताना पाय घसरून एका भाविकाचा मृत्यू झाल्याने यात्रोत्सवात शोककळा पसरली आहे.
१२ एप्रिलच्या मध्यरात्री, महालक्ष्मी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या ध्वजारोहणाचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पडला. रात्री बारा वाजता मंदिरात विशेष पूजाअर्चा करून पुजाऱ्यांच्या हस्ते ध्वज सुळका डोंगराच्या शिखरावर नेण्यात आला. या वेळी हजारो भाविक, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर यात्रेचा धार्मिक कार्यक्रम औपचारिकरीत्या सुरू झाला.
मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास काही उत्साही तरुणांनी डोंगराच्या अत्युच्च टोकावर चढण्याचा प्रयत्न केला. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आणखी उंच शिखराकडे जाण्याच्या प्रयत्नात त्यातील एका भाविकाचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
मृत भाविकाचे नाव मेरीक कन्हैयालाल कांचवाला (वय ३८, रा. सुरत, गुजरात) असे असून, ते खास महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी सुरत येथून आले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. नंतर मृतदेह डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व तपासणीनंतर कांचवाला यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या हृदयद्रावक घटनेमुळे यात्रेत सहभागी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी भाविकांना पर्वतरांगेत काळजीपूर्वक व मार्गदर्शकांच्या मदतीनेच चढण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment