बोईसरमध्ये जेष्ठ नागरिकाची 'डिजीटल अटक'च्या नावाखाली फसवणूक करणारे ८ आरोपी अटक

बोईसरमध्ये जेष्ठ नागरिकाची 'डिजीटल अटक'च्या नावाखाली फसवणूक करणारे ८ आरोपी अटक

पालघर : दिनांक १८/१२/२०२४ ते १०/०२/२०२५ या कालावधीत बोईसरमध्ये एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. जेष्ठ नागरिक अनिलकुमार विष्णु आरेकर यांना प्रदीप सावंत नावाच्या इसमाने मोबाईल नंबर ८२३७५१६८५८, ७२४९२२०४४५, ९१७२७३६५५१ या नंबरवर व्हॉटस्अॅप व्हाईस कॉल्स करून अंधेरी पोलीस ठाण्याचा अधिकारी असल्याचे भासवले. आरोपीने फिर्यादीस सांगितले की, त्यांचा मोबाईल नंबर इललिगल अॅडव्हरटायझिंग आणि हॅरेसमेंटमध्ये ट्रेस झाला आहे. त्यानंतर, आरोपीने दावा केला की, त्यांची केस सीबीआयकडे गेली आहे आणि सीबीआय तपास करणार आहे.

आरोपीने पुढे सांगितले की, फिर्यादीची पोलीस कस्टडी घेतली जाईल आणि सहकार्य न केल्यास, दहा मिनिटांत पोलीस त्यांच्या घरी येतील. आरोपीने फिर्यादीला धमकावत सांगितले की, गुप्तता न राखल्यास त्यांना ५ वर्षांची अतिरिक्त शिक्षा होईल. त्याने सीबीआय पब्लिक प्रोसिक्यूटर प्रमोद शंकर भोसले यांचे नाव घेतले आणि फिर्यादीला जेष्ठ नागरिक असल्याचे सांगून त्यांना त्रास न होण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी केली. आरोपीने फिर्यादीला आश्वासन दिले की, रिझर्व्ह बँक आणि सीबीआय चौकशी करून १० मार्च २०२५ पर्यंत पैसे परत केले जातील.


यानंतर, फिर्यादीला डिजिटल अरेस्ट करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३,५६,६०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि त्यांचा पैसा हडप केला. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १४९/२०२५ नोंदविण्यात आला असून, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सायबर पोलीस ठाणे व बोईसर पोलीस ठाणे यांना तपासासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि सखोल तपास करत आरोपी क्र. १ ते ४ यांना नागपूर येथून, आरोपी क्र. ५ ते ७ यांना अंकलेश्वर, गुजरात येथून तसेच आरोपी क्र. ८ यास बंतारा, औरंगाबाद, बिहार येथून अटक केली आहे.


अटक केलेले आरोपी:

मो. सैफ रिजवान अहमद अन्सारी (नागपूर)

मो. फैज रिजवान अहमद अन्सारी (नागपूर)

मो. झोएब रिजवान अहमद अन्सारी (नागपूर)

गुणवंत रामराव मते (नागपूर)

झकरीया असरार इझोया (गुजरात)

शोएब मोहम्मद हनिफ शहा (गुजरात)

रिझवान साबीर हुसैन मलिक (गुजरात)

बाबर मो. सिराज खान (बिहार)


सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय लिंक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात सर्व शक्यतांची पडताळणी करण्यासाठी पथकाने तपास सुरू ठेवला आहे. आरोपी क्र. १ ते ७ यांना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पालघर यांनी ११/०४/२०२५ रोजी पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर आरोपी क्र. ८ यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये शिरीष पवार, पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे, अजय गोरड, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, तसेच पोलीस उप निरीक्षक श्रीमती रुपाली गुंड, चंद्रकांत हाके, विठठल मनिकेरी, पोहवा/दुबळा, पोहवा/रमेश पालवे, पोहवा/शरद सानप, पोहवा/राहुल पाटील, पोअं/मयुर पाटील नेम बोईसर पोलीस ठाणे, पोअंम. / रामदास दुर्गेष्ट, पोअं/रुपेश पाटील, पोअं/जिग्नेश तांबेकर नेम सायबर पोलीस ठाणे यांचा सहभाग होता.


सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरीष पवार, पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक