महागाव कुकडेतील रस्त्याचे निकृष्ट काम; ग्रामस्थांचा संताप, चौकशीची जोरदार मागणी

महागाव कुकडेतील रस्त्याचे निकृष्ट काम ; ग्रामस्थांचा संताप, चौकशीची जोरदार मागणी

पालघर – महागाव तालुक्यातील कुकडे गावात जिल्हा परिषद निधीतून अंदाजे १० लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, योग्य बेस न देता थेट मातीवरच काँक्रीट टाकण्यात आले आहे. परिणामी रस्त्याचा टिकाऊपणा धोक्यात आला असून, काही दिवसांतच त्यावर दुरवस्थेची लक्षणे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, या कामासंदर्भात कोणताही माहिती फलक देखील लावण्यात आलेला नव्हता, ज्यामुळे पारदर्शकतेचा पूर्ण अभाव होता.

रस्त्याची लांबी व रुंदी सुसंगत नसून, अनेक ठिकाणी तो इतका अरुंद आहे की वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. ठेकेदाराने पर्यायी रस्ता न ठेवता थेट मुख्य रस्त्यावरच काम सुरू केल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्थानिकांनी सांगितले की, “ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही काम थांबवले होते. मात्र, कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने ठेकेदाराने मनमानी करत काम पूर्ण केले.”


सदर कामासाठी २५ मार्च ते ५ एप्रिल असा कालावधी दर्शवणारा फलक लावण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात हे काम अवघ्या तीन दिवसांत – ३० मार्च रोजीच – पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, रस्ता पूर्ण होण्याआधीच कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी स्वतः मोजमाप करून बिल तयार केले असल्याचे समोर आले आहे.


यासंदर्भात  कनिष्ठ अभियंता कांबळे यांना निष्कृष्ठ दर्जाच्या कामाबद्दल विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्याकडे २५ गावे आहेत. त्यामुळे प्रत्येक कामाकडे लक्ष देणे कठीण आहे. मी स्वतः मोजमाप करून बिलावर सही केली आहे.” दुसरीकडे, याच विभागातील दुसरे कनिष्ठ अभियंता अष्टेकर यांनी सांगितले की, “कुकडे माझा बीट असूनही या कामाची कोणतीही माहिती मला देण्यात आलेली नाही.”


ग्रामसेविका भारती कांबळे यांनी देखील याप्रकरणी सांगितले की, “या कामाची कोणतीही अधिकृत माहिती, पत्र अथवा सूचना मला देण्यात आलेली नाही. मला विश्वासातही घेण्यात आले नाही.”


या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सखोल चौकशीची आणि तात्काळ कारवाईची मागणी करत इशारा दिला आहे की, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक