वाढवण बंदरलगत जमीन व्यवहारात भ्रष्टाचाराचा वास – चौकशीची मागणी वाढली
वाढवण बंदरलगत जमीन व्यवहारात भ्रष्टाचाराचा वास – चौकशीची मागणी वाढली
अमित चुरी-मितेश ठाकूर यांच्यातील जमीन व्यवहारावरून खळबळ
दरम्यान, जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर जमिनीचे मुल्यांकन सोईस्कररीत्या वाढवून काळ्या पैशाचे रूपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मौजे बावडे गट क्र. ३१९/४ क्षेत्र १.१६.४० हेक्टर या आर हद्दीतील जमिनींपैकी २० गुंठे जमीन अधिग्रहणाच्या मार्गात असून, याच भागात प्राथमिक स्वरूपात गैरव्यवहार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे.
केतखाडी येथील अमित भालचंद्र चुरी यांनी आपल्या मेहुण्या मितेश राजेंद्र ठाकूर यांना २० गुंठे जमीन तब्बल २ कोटी २० लाख रुपयांना विकल्याचा व्यवहार नोंदवण्यात आला आहे. हा व्यवहार डहाणू येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यात आला असला, तरीही मितेश ठाकूर यांचे एचडीएफसी बँक (बोईसर शाखा) मध्ये खाते नसताना त्यांच्याच नावाने धनादेश देण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे बोगस व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताची शक्यता वर्तवली जात असून, त्यांच्याकडून काळी कमाई पांढरी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमित चौबे यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
जर ही चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली, तर वाढवण बंदर परिसरातील खऱ्या जमिनीच्या किमती समोर येतील आणि भविष्यात शासनासह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्यापासून रोखता येईल, असे चौबे म्हणाले.
Comments
Post a Comment